ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.7 - शॉर्ट सर्किटमुळे शहादा नगरपालिकेच्या सभा लिपिक विभागाला आग लागून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत 1990 पासूनच्या सभांचे इतिवृत्त जळाल्याचे समजते. या आगीची चौकशी करण्यात येणार असल्याचे नगरपालिका सूत्रांनी सांगितले.
बुधवारी रात्री सव्वानऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास कुलूप बंद असलेल्या नगरपालिका कार्यालयाच्या तळमजल्यावरील मुख्याधिकारी कॅबिनला लागून असलेल्या सहा विभागांपैकी लिपिक विभागास शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. पालिकेच्या दोन्ही अगिAशमन बंबांनी वेळेवर येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेजारील जन्म-मृत्यू नोंद विभागासह इतर विभागही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.
या आगीत महत्त्वाच्या कागदपत्रांसह सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य जळून राख झाले. याबाबत वॉचमन सागर साळुंके यांनी पोलिसात खबर दिली आहे.
आगीत 1990 पासूनची सभावृत्त तसेच नागरी सुविधा केंद्राची महत्त्वाची कागदपत्रे जळाली असून, इतर कागदपत्र, रजिस्टर, फाईली पाण्यामुळे खराब झाल्या. विजय पाटील व इतर नगरसेवकांनी तातडीने पालिका कर्मचारी व अधिका:यांच्या मदतीने कार्यालयीन दस्तावेज इतरत्र हलविल्याने मोठे नुकसान टळले. रात्री उशिरार्पयत आग विझविण्याचे व दस्तावेज काढण्याचे काम सुरू होते.