लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : शहराजवळील दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहे. रस्त्यावरील खडी वर आल्याने मोठय़ा वाहनाच्या टायरखाली खडी येऊन ती उधळून पादचारी व दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान, या पुलाचे काम महिनाभरापासून बंद असून पावसाळ्याआधी हे काम पूर्ण झाले नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.केंद्र शासनाच्या रस्ते विभागाकडून विसरवाडी ते सेंधवा महामार्गादरम्यान कोळदा ते खेतिया दरम्यान रस्ता दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यादरम्यान शहादा शहराजवळ दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाला येतो. या नाल्यावर दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामामुळे खडी-मुरुम टाकून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावरुन दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असल्याने पर्यायी रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. या खडय़ांमधून अवजड वाहन काढताना चालकांना कसरत करावी लागते. अनेकवेळा अपघातही होत आहेत. दुचाकींचे अपघात तर नित्याचीच बाब झाली असून अनेकजण जखमी झाले आहेत. हा पर्यायी रस्ता खडीचा असल्याने वाहनांच्या कायमच्या वर्दळीमुळे खडी रस्त्याच्यावर आली आहे. ही खडी मोठय़ा वाहनाच्या टायरखाली येऊन पादचारी व दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटनाही वाढत आहेत. सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या ये-जामुळे रस्त्यावर धूळ उडते. या धुळीचा त्रासही दुचाकीस्वावर व रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे भेंडवा नाल्यावरील दोन्ही पुलांच्या कामाला गती देऊन ते लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
शहाद्यात पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेने अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:04 PM