लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरात बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत उशिरार्पयत पोलीस नोंद झालेली नव्हती. गेल्या 15 दिवसांपूर्वीही याच वसाहतीत चोरी झाली होती.शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरमध्ये शहादा पंचायत समितीत अभियंता असलेले कैलास रमण ढोले हे पंकज हिरालाल वाडिले यांच्या बंगल्यात भाडेकरू आहेत. ते धडगाव येथे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरटय़ांनी घराच्या पुढील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी गोदरेज कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला व लॉकर फोडले. कपाटातील 38 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमच्या दोन अंगठय़ा, 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान अंगठय़ा असे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपये असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला.रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजा:यांना संशय आला. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कैलास ढोले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर वाडिले हे कुटुंबासह शहादा येथे आले. घरी पोहोचल्यावर घरातील कपाट तोडून चोरटय़ांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांचे लक्षात आले. याबाबत पोलिसांत घटनेची माहिती देण्यात आली. मात्र उशिरार्पयत नोंद झालेली नव्हती. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीही याच वसाहतीत चोरी झाली होती. पुन्हा रविवारी पहाटे चोरी झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शहाद्यातील घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:29 PM