सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केवळ पाटचारींचे पाणी शहरातील नागरी वस्त्या आणि रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटबंधारे विभागच शहराच्या दुर्दशेला जबाबदार असून या विभागातर्फे अजूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्याने हा विभाग किती निद्रीस्त आहे हेच यावरून स्पष्ट होते. शहादा तालुक्यात गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला. 2006 च्या महापुरानंतर गेल्या आठवडय़ात पहिल्यांदाच गोमाई नदीला दोनवेळा पूर आला. गोमाई नदीला पूर आला असला तरी नदीजवळील वसाहत सोडली तर शहरात गोमाईच्या पुराने कुठेही तसूभरही नुकसान झालेले नाही. शहरातील अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी घुसून जे प्रचंड नुकसान झाले, जनतेला जो त्रास झाला तो केवळ पाटचारींचे पाणी शहरात घुसल्यामूळे. शहरातून तीन नाले जातात त्यात एक डोंगरगाव रोडला लागून भाजी मंडई जवळून निघतो. दुसरा नाला जुना मोहिदा रोडकडून सप्तशृंगी मंदिराजवळून निघतो तर तिसरा भेंडवा नाला दोंडाईचा रोड क्रॉस करुन नवीन पोलिस स्टेशनकडून निघतो. हे तिघे नाले शहरातून जात असल्याने पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे आवश्यक असताना पाटबंधारे विभागाने साफसफाई तर दूरच ज्या व्यावसायिकांनी, रहिवाशांनी पाटचा:या बुजून नाल्यांचे अस्तित्वच मिटवून टाकले त्यांच्याकडेदेखील कानाडोळा करुन जबाबदारीतून हात झटकले आहेत. डोंगरगाव पाटचारी लोणखेडा बायपासपासूनच अस्तित्वहिन होत आहे. या पाटचारीलगत असलेल्या व्यावसायिकांनी, हॉस्पिटल चालकांनी, रहिवाशांनी पाटचारीला आपली प्रॉपर्टी समजून पाटचारीमध्ये भराव करुन पाटचारींचे अस्तित्व मिटवल्याने या पाटचारीतील पाण्याला मार्गच नसल्याने हे पाणी रस्त्यावर व वसाहतींमध्ये पसरले. शुक्रवारी पटेल रेसिडेन्सी चौकात तर कमरेइतके पाणी साचल्याने चोहोबाजूंची वाहातूक ठप्प झाली. श्रीराम कॉलनी व परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. न्यायालयात पाणी घुसल्याने फाईली व कागदपत्रे ओली झाली. हेच पाणी पुढे पीपल्स बँकेकडून, दर्गाजवळून दोंडाईचा रोडवर येऊन विश्रामगृह, बाजार समिती व स्टेट बँकेत शिरले. पुढे संभाजी नगर, विजय नगरला देखील या पाण्याने वेढा दिला. संभाजी नगरात अनेक घरात पाणी घुसले. मोहिदा रोडवरील नाल्याचे पाणी यशवंत नगर, साईबाबा नगरमध्ये शिरले. पुढे हेच पाणी जैन प्लाझासमोरून परिसरातील घरांमध्ये शिरले. दोंडाईचारोड जवळून जाणा:या भेंडवा नाल्याच्या पाण्याने नवीन पोलीस स्टेशनसह संपूर्ण परिसरालाच वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शहरातील या सगळ्या वसाहती, परिसर केवळ पाटचारींच्या पाण्यामुळे प्रभावित झाल्याने नागरिकांचे जीव टांगणीला लागले. पावसाळ्यापूर्वी या पाटचा:यांची साफसफाई करुन पाण्याचा मार्ग मोकळा केला असता तर शहरात हाहाकार उठला नसता. केवळ पाटचा:यांच्या पाण्यामुळे शहर जलमय होऊन नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे एवढी भयंकर आपत्ती शहादेकरांवर आल्यानंतर अजूनही पाटबंधारे विभागाने पाटचारींची साफसफाई न केल्याने पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पुन्हा शुक्रवारसारखीच परिस्थिती येऊ शकते.
संततधार पावसाने शहादा शहरात पाटाचे पाणी शिरून अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनामार्फत या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. शहादा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाउस सुरु आहे. या पावसाने शहरात बहुतांशी ठिकाणी पाणी साचून राहिले असल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे शहरातून गेलेल्या पाटाचे पाणी डोंगरगाव रस्त्याने वाहून एस.टी. महामंडळाच्या खुल्या जागेतून पिपल्स बँकेजवळून दोंडाईचा रस्त्यावरील दग्र्याच्या शेजारून दोंडाईचा रस्त्यावर येते. त्याचप्रमाणे त्याच्याशेजारील समता भवन रस्त्यावरूनही पाणी नदीच्या स्वरुपात दोंडाईचा रस्त्यावर येते. 8 ऑगस्टच्या रात्री या गल्लीतून नदीच्या स्वरुपात पाणी वाहिल्याने तेथील सर्वच दुकानांमध्ये दोन दिवस पाणी साचून राहिल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी दुकानातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक सामानांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.