लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शेठ व्ही.के. शाह विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सव 2017 चा समारोप रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात अक्षर पालखीसह ग्रंथ प्रदर्शन, साहित्य मेळाव्याची भरगच्च मेजवानी शहादेकरांनी अनुभवली.महाराष्ट्र शासन उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी होते. या वेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तहसीलदार मनोज खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोपापूर्वी धुळे येथील भगवंत चव्हाण यांचा ‘आपल्या मुलांना घडवताना.. पालकांशी मोकळा संवाद’ हा प्रत्यक्ष बदल घडवणारा वैज्ञानिक कार्यक्रम व ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार प्रदीप निफाडकर यांचा गझल व कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी निफाडकर यांनी विविध सामाजिक, कौटुंबीक विषयावर प्रकाशझोत टाकून रसिकांना खिळवून ठेवले. तत्पूर्वी बालकवी संमेलनात 30 बालकवींनी सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी कवी रमेश महाले होते. या वेळी डॉ.पुष्कर शास्त्री, प्रवीण महाजन यांची उपस्थिती होती. दुपारी जिल्ह्यातील खुले कवी संमेलन झाले. यात 50 कवींनी सहभाग नोंदवला. कवी संमेलनास हेमलता पाटील यांची उपस्थिती होती. ‘आकाशवाणी आणि मी’ या विषयावर जळगाव आकाशवाणीच्या केंद्रसंचालिका डॉ.उषा शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रीती अभिजित पाटील होत्या.समारोप सायंकाळी साडेसहा वाजता झाला. सूत्रसंचालन नुपूर पाटील, राजेंद्र निकुंबे, सरिता खाचणे यांनी केले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले. ग्रंथोत्सव यशस्वीतेसाठी हिरालाल पाटील, दिनेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव आदींनी परिश्रम घेतले
विविध उपक्रमांची शहादेकरांना मिळाली मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:59 AM