लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : मंदाणे येथील प्रसिद्ध कृषक दैवत अष्टभूजा शाकंभरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवास शुक्रवार, १० जानेवारीला पौष पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे. ग्रामपंचायत व मंदिर समितीतर्फे यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेनिमित्त व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त पौष शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी मंदाणे येथे यात्रा भरते. गेल्या तीन वर्षांपासून दक्षिणकाशी प्रकाशा येथून पायी कावडयात्रेचे आयोजन केले जाते. या पदयात्रेत मंदाणे परिसरातील २०० भाविक सहभागी होतात. ही कावड पदयात्रा मंदाणे येथे पोहोचल्यानंतर वाजत-गाजत मिरवणूक काढून आदिशक्ती शाकंभरी अष्टभूजा माता मंदिरात जलाभिषेक केला जातो.कावड यात्रेत शहादा येथे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मंदिराचे विश्वस्त अनिल भामरे, किरण मोरे व पदयात्री सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त शुक्रवारी सकाळी मंदिरात महाअभिषेक, महापूजा व मुख्य आरती उपसरपंच अनिल भामरे सपत्नीक करणार आहेत. या वेळी ग्रामस्थ व परिसरातील भाविक उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.अष्टभूजा देवीच्या याात्रोत्सवामुळे चैतन्यमय व भक्तीमय वातावरण आहे. यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. यात्रेत २४ तास बंदोबस्त राहणार असून भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. भाविकांची गर्दी पाहता मंदिराबाहेर बॅरेकेट्स लावले आहेत. दर्शनासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येते. नारळ फोडण्यासाठी वेगळी व्यवस्था केली असून, पाणीपुरवठ्यासाठी नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहे. ही यात्रा १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस भरते. मसाल्याचे पदार्थ, खेळणी, हॉटेल्स, संसारोपयोगी वस्तू, शेती अवजारे आदी व्यावसायिक यात्रेत दुकाने थाटतात. यात्रा काळात नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होते.
मंदाणे येथे शाकंभरी देवीचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:47 PM