लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका दुकानात हमालाला विजेचा शॉक लागल्याने त्याच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागल्याची घटना घडली. जखमीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये असलेल्या काही दुकानदारांनी वायरमनला हाताशी धरून बेकायदेशीर वीजपुरवठा घेतला आहे. या दुकानदारांकडून संबंधित वायरमनला महिन्याला 400 ते 500 रुपये दिले जातात. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिपरिप आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचलेले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवार व गुरुवारी पहाटे भाजीपाल्याचा लिलाव होतो. त्या दिवसाच्या आदल्या रात्रीपासूनच तालुका व तालुकाबाहेरचे भाजीपाला विक्रेते रात्री भाजीपाला मार्केटमध्ये येतात. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सूर्यकांत बंडू सोनवणे हे भाजीपाला मार्केटमध्ये हमाली काम करीत असताना बेकायदेशीरपणे घेतलेल्या वीज कनेक्शनच्या वायरीतून वीज प्रवाह उतरल्याने त्यांना शॉक लागला. त्यात सोनवणे हे फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांना येथील डोंगरगाव रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, भाजीपाला मार्केटमध्ये अनेक दुकानदारांनी बेकायदेशीर वीज कनेक्शन घेतले आहे. वायरमनला हाताशी धरुन महिन्याकाठी 400 ते 500 रुपये एका दुकानदाराकडून दिले जातात. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असताना त्याकडे वीज कंपनीच्या अधिका:यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. बेकायदेशीर वीजपुरवठय़ाला सहकार्य करणा:या वायरमन व अधिका:यांची चौकशी करण्याची गरज आहे.
शहाद्यात शॉक लागून हमाल जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:16 PM