लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/तळोदा : तालुक्यातील सोजरबार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका ठार झाली़ गुरूवारी पहाटे बालिका झोपडीत झोपलेली असल्याने बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला ओढून नेले़ गंभीर अवस्थेतील बालिकेस तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तिला मृत घोषित करण्यात आले़घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून तळोदा तालुक्यात गेल्या तीन महिन्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मानवी मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे़ शिला भिमसिंग नाईक असे मयत बालिकेचे नाव आहे़ तळोदा व अक्कलकुवा तालुक्याच्या सिमेवर अत्यंत दुर्गम भागात सोजरबार गाव आहे़ गुरूवारी पहाटे गावापासून काही अंतरावर वनक्षेत्रालगत राहणारे भिमसिंग नाईक हे कुटुंबासोबत झोपडीत झोपले होते़ दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्या झोपडीत शिरला़ याठिकाणी त्यांची लहान मुलगी शिलाबाई ही झोपली असताना झडप घालून तिला ओढून बाहेर नेले़ बिबट्याच्या हल्ल्याने जाग आलेल्या बालिकेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आरोळ्या मारल्याने वडील भिमसिंग यांना जाग आली़ तोवर बिबट्याने बालिकेचे जागोजागी लचके तोडत जखमी केले़ नाईक यांनी बिबट्याला हुसकावून लावल्यानंतर त्याने तिला घरापासून काही अंतरावर सोडून देत पळ काढला़जखमी बालिकेस तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी करुन मृत घोषित केले़ बालिकेचे डोके, गळा, जबडा तसेच पाठीवर बिबट्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी होवून मयत झाली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल सी.डी.कासार, सहायक वनसंरक्षक कापसे, अक्कलकुव्याच्या वनक्षेत्रपाल सोनाली गिरी, पोलीस कर्मचारी मोहन वळवी, दिनकर गुले, वनपाल आंनद पाटील, वनरक्षक आऱजे़़शिरसाठ, विरसिंग पावरा, राज्या पावरा, श्रावण कुंवर, एस आर. देसले यांनी घटनास्थळी भेट दिली़तळोदा तालुक्यापासून वाल्हेरी गावापासून दुर्गम भागात सोजरबार हे गाव आहे़ तेथून आणखी काही अंतरावर भिमसिंग नाईक हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत़ बिबट्याच्या हल्ल्यानंतर मुलीला अंगावर टाकून नाईक दांम्पत्य पायी दऱ्याखोºयातून वाल्हेरी गावापर्यंत आले होते़ तेथून खाजगी वाहनाने ते तळोदा येथे आले़ तोवर बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे़
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:42 PM