लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत लहान कडवानला शाश्वत स्वच्छता अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील उघडय़ावरील हगणदरीमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले. या निवडीबाबत तेथे महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारिका बारी, उपमुख्य अधिकारी जालिंदर, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, सहायक गटविकास अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते. गावातील युवक-युवतींनी पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. लहान कडवान ग्रामपंचायतीने एन.एस.ई. फाऊंडेशन यांच्या मदतीने शाश्वत स्वच्छता आराखडा तयार केला. त्यानंतर गावात नोव्हेंबर 2018 पासून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ, युवक मंडळ यांच्यामार्फत गावात उघडय़ावरील हगणदरीमुक्तीसाठी विविध उपक्रमांद्वारे लोकप्रबोधन करण्यात आले. अथक परिश्रमाने ही ग्रामपंचायत शाश्वत हगणदरीमुक्त करण्यात आली. त्याबद्दल ग्राममहोत्सव घेऊन ही ग्रामपंचायत शाश्वत उघडय़ावरील हगणदरीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी किरण गावीत, योगेश कोळपकर, कुवर आर.के. गावीत, सरपंच गोविंद गावित, उपसरपंच वंदना पाडवी, ग्रामसेविका अर्चना वसावे, किशोर गावीत, संगीता गावीत, शिवाजी गावीत, जिल्हा व्यवस्थापक सुनील सहारे, क्लस्टर समन्वयक आकाश सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
लहान कडवान ग्रामपंचायत हगणदरीमुक्त घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:17 PM