लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वृंदावन कॅालनीत मंदीरात दर्शनासाठी जाणा-या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी धूमस्टाईल सोनपोत लंपास केल्याची घटना घडली. ६० हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोनपोत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन कॅालनीत राहणाऱ्या स्मिताबेन भरतकुमार शहा (६३) या नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता जैन मंदीरात दर्शनासाठी जात होत्या. अहिंसा चौक ते मंदीर दरम्यानच्या रस्त्यावर कुणी नसल्याचे पाहून दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांना काही कळण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओढून घेत पोबारा केला. स्मिताबेन यांनी आरडाओरड केला, परंतु दुचाकीस्वार भरधाव तेथून पसार झाले. अहिंसा चौक व पुढे नळवा रस्त्याकडे दुचाकीस्वार पसार झाल्याचे सांगण्यात आले. दीड तोळे वजनाची व ६० हजार रुपये किंमतीची सोनपोत असल्याचे स्मिताबेन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक धनराज निळे करीत आहे. पोलिसांनी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून धागेदोरे मिळाले असल्याचे सांगण्यात आले. लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, धूम स्टाईल जबरी चोरी करणारे चोरट्यांना प्रतिबंध करण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु या घटनेमुळे हे चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिलेच्या गळ्यातून धूमस्टाईल सोनपोत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 1:35 PM