लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व सेल्को यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम वाटवी येथील सामूहिक संस्थांच्या सोलार प्रकल्पांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, नवापूर पं.स.च्या सभापती सविता गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, बागूल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अजित नाईक, वाटवीच्या सरपंच लैला कोकणी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, सविता जयस्वाल, अॅड.योगिनी खानविलकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील सहा गावांची निवड करण्यात आली असून, यापैकी वाटवी हे एक गाव आहे. या गावात शासनाच्या सर्व योजना एकत्रिपणे लागू करून या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. रोजगार हमी योजनेचे सर्व पॅकेजनुसार योजना द्याव्यात. सर्व यंत्रणांच्या कामांच्या यादीमध्ये ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत निवड केलेल्या गावांचा समावेश असणे आवश्यक आहे. डिजिटल शाळेत विजेअभावी समस्या निर्माण होवू नये यासाठी या शाळेत सोलार प्रकल्प देण्यात आला असून, या गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना घराची, शेतीची कामे न लावता शाळेत शिक्षणासाठी पाठवावे. आपला देश विकासाच्या मार्गावर असून गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे परिवर्तन करू या, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी वाटवी हे गाव अतिशय उत्साही गाव असून या योजनेमुळे या गावाला राजस्तराचा हिस्सा मिळाला आहे. या गावात शोषखड्डे, शौचालये, गांडूळखत, विहिरी, कंम्पोस्ट खत, शेततळे अशी कामे सुरू आहेत. या गावातील एकही व्यक्ती दुस:या गावात कामाला जाणार नाही, असे नियोजन करावे. लोकसहभागातून हे गाव परिवर्तीत होणार आहे, असा विश्वास आहे. सूत्रसंचालन सुनील भामरे यांनी तर आभार गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मानले.
वाटवी येथे सोलर प्रकल्पांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:56 PM