ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : आदिवासी दुर्गम भागात जेथे वीज पोहचली नाही किंवा नळ पाणीपुरवठा योजना नाहीत अशा गाव पाडय़ांवर 400 ठिकाणी सौरपंपद्वारे पाणी पुरवठा अर्थात सौर उर्जेवर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यातील काही ठिकाणी कामेही सुरू झाली आहेत.सातपुडय़ातील दुर्गम भागात भौगोलिक परिस्थितीमुळे नळ पाणीपुरवठा करता येत नाही. परिणामी अशा गाव, पाडय़ातील नागरिकांना झरे किंवा नदीचे पाणी प्यावे लागते. टंचाई कृती आराखडय़ात देखील अशा ठिकाणी उपाययोजना करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम ठरते. यंदाच्या टंचाई आराखडय़ात धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील गावांची संख्या कमी असली तरी त्या भागात आतापासूनच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी मंजुर केलेल्या सौर पंपांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ठिकाणी ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे.वाहन जाण्यास अडचणीसातपुडय़ातील अनेक गाव व पाडे ही उंचावर तर काही ठिकाणी तीव्र उतारावर आहेत. परिणामी अशा गाव, पाडय़ांमध्ये कुपनलिका खोदाईचे वाहन जाण्याची मोठी कसरत असते. ही बाब लक्षात घेता गाव, पाडय़ाच्या मोक्याच्या जागेवर कुपनलिका घ्यावी लागते. जेणेकरून दोन, तीन पाडय़ांना ती मध्यवर्ती ठिकाणी व सोयीचे ठरते. अशा ठिकाणी हातपंप बसविला जातो किंवा त्यावर वीजपंप बसवून पाणीपुरवठा केला जातो. परंतु खोदाईची मर्यादा असल्यामुळे अशा कुपनलिकांमधील पाणी पातळी लवकर कमी होते. 400 सौरपंपजिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पाण्यासाठी 280 दुहेरी सौरपंप आदिवासी विभागाकडून व 100 राष्ट्रीय जलयुक्त अभियानाकडून मिळाले की ते या ठिकाणी अर्थात जेथे पाणी लागेल तेथे ते बसविण्यात येऊन तेथील जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी विविध योजनांद्वारे देखील असे पंप बसविले जाणार आहे. नुकतेच भगदरी ग्रामपंचायतअंतर्गत खडकापाणी, पाडवीपाडा, मोजापाडा, उंबराबारीपाडा, हि:याबारीपाडा, खुंटबार, लकडाई, डोंगरफळी, निकपाणी, गव्हाणीचापाडा या ठिकाणी सौर उज्रेवर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली असून त्यासाठी 36 लाख 50 हजार 130 रुपये खर्च अपेक्षीत आहे.
नंदुरबारातील दुर्गम भागात 400 ठिकाणी सौरपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:06 PM