नंदुरबार: शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. विनोद बाळू शिंदे (४२), रा. सावखेडा, ता. शहादा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील वरुळ-कानडी येथील तक्रारदार शेतकरी यांचे वडिलोपार्जित शेतजमिनीची ४ ऑक्टोबर २०२३ रोजी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती.
परंतु काही कारणास्तव तक्रारदार यांना शेतजमिनीची पुन्हा फेरमोजणी करावयाची असल्याने फेरमोजणीच्या अर्जासह भूमिअभिलेख कार्यालय येथे गेले होते. तेव्हा भूमिअभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद शिंदे यांनी तक्रारदार यांना तुम्ही अर्ज करू नका, मी तुमचे शेतात येऊन मोजणी करून देतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला तीन हजार रुपये द्या, असे सांगून लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. शनिवार, १६ मार्च रोजी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना विनोद शिंदे यास रंगेहात अटक करण्यात आली.