लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे तसेच लॅाकडाऊनमुळे यंदा शाळा बंद आहेत. असे असतांनाही खाजगी शाळांनी पालकांकडे शैक्षणिक शुल्काचा तगादा लावला होता. पाल्यांना ॲानलाईन क्लास तसेच परिक्षांनाही बसू देण्याबाबत इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पालकांनी थेट अधिकारी व लोकप्रतिनधींकडे धाव घेतल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढून शैक्षणिक शुल्कामुळे एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता खाजगी शाळांनी घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांचा जीवात जीव आला आहे. यंदा शाळा बंद आहेत. नुकत्याच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. असे असतांनाही पहिले ते १२ वी पर्यंतच्या अनेक खाजगी शाळांनी शैक्षणिक शुल्क नेहमीप्रमाणे अकारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र स्वत: खाजगी शाळा संचालकांनीच यंदा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे स्वागतही करण्यात आले. परंतु संबधीत शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांमागे तगादा लावण्यात आला होता. अनेक पालकांचे लॅाकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प होते. रोजगार देखील बंद होते. त्यामुळे काही पालकांना यंदा शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु अर्धे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांनी पुन्हा शुल्क वसुलीसाठी पालकांना मेसेज पाठविणे सुरू केले. शुल्क न भरल्यास ॲानलाईन क्लासला बसू न देणे, परीक्षेला बसू न देणे यासह इतर सुचना दिल्या जात होत्या. त्यामुळे पालकांनी थेट जिल्हाधिकारी, जि.प.सीईओ, शिक्षणाधिकारी तसेच लोकप्रतिनधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी आर.बी.रोकडे यांनी सर्व शाळांना पत्र पाठवून शैक्षणिक शुल्काअभावी एक विद्यार्थी वंचीत राहू नये. तसे आढळल्यास कारवाईचा देखील इशारा दिला आहे.
काय होत्या पालकांच्या तक्रारी शुल्क न भरल्याने काही शाळा आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांचे गुण सांगत नाहीत.ऑनलाईन क्लास सुरु असतांना शिक्षक विद्यार्थ्यांना शुल्काबाबत विचारण करीत असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे. त्यांना आडकाठी करू नये. जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न व्हावा.
इतरही खर्च मोठा...खाजगी शाळांनी मे महिन्यापासूनच ऑनलाईन क्लासेस सुरू केले. त्यामुळे अनेक पालकांना त्यावेळीच स्मार्ट फोन, इंटरनेट कनेक्शन घेणे भाग पडले. त्याचा खर्च वाढला. शिवाय शाळा बंद असतांनाही शुल्क जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न झाला. तर शिक्षकांना नियमित पगार देणे, ऑनलाईन शिक्षण देणे, दैनंदिन इंटरनेट व इतर खर्च येत असल्याने शुल्क अकारणी करावी लागत आहे. त्यातही कपात केलेली असल्याचे शाळांचे म्हणने आहे.
शैक्षणिक शुल्का बाबत अनेक शाळांनी सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आमचे पाल्य खाजगी शाळेत अशा परिस्थितही शिकु शकले. मात्र काही शाळांनी आडमुठेपणा घेतल्यामुळे विद्यार्थी व पालक मेटाकुटीस आले होते. - धनंजय जाधव, पालक
यंदा अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे शुल्क कमी करावे अशी मागणी होती. ती आता काही प्रमाणात मान्य झाली आहे. त्यासाठी मात्र लढा द्यावा लागला हे दुर्देव आहे. -जयेश कोचर, पालक
शाळांनी अगदी सुरुवातीापासूनच क्लास सुरू केेले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. ही बाब जमेची आहे. त्याबाबत पालक समाधानी आहेतच. परंतु शुल्क भरण्याबाबत सवलत मिळावी अशी आमची मागणी आहे. -स्वप्नील राकेचा, पालक