तळोदा तालुक्यातील रेवानगर या वसाहतीची १९९५ मध्ये स्थापना झाल्यानंतर सन २००० मध्ये जिल्हा परिषदेत समावेश झाला. त्यानंतर तेव्हाच पहिली निवडणूक झाली होती. या वसाहतीची लोकसंख्या साधारण चार हजारापेक्षा अधिक आहे. येथे चार प्रभाग असून, ११ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत आजी-माजी पंचायत समितीच्या सदस्यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तर माजी सदस्य नाथा पावरा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल उभे आहे. दोघांनी आलटून पालटून पंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. नाथा पावरा यांनी तब्बल १५ वर्षे सत्ता गाजवली होती तर गेल्या वेळी दाज्या पावरा यांची सत्ता होती. नाथा पावरा हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तर दाज्या हे भाजपचे पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांनी पंचायत समिती निवडणुकीत नाथा पावरा यांचा पराभव केला होता. या वेळी ही या पारंपरिक विरोधकांमध्येच आपल्या अस्तित्वाकरिता लढत होत आहे. दोघांनी आपापले पॅनल निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पॅनलकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. चारही प्रभागांत एकास एक लढत होत असल्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातही काही ठिकाणी नात्या-गोत्यातील उमेदवारांमध्ये आपसात लढत होत असल्याने नातेवाइकांनादेखील प्रश्न पडला आहे, असे असले तरी वसाहतीतील बहुसंख्य मतदार रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या मतदानाकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना मतदानासाठी आणण्याकरिता उमेदवारांकडून आतापासूनच वाहनांची तजवीज केली जात आहे. त्यांचे पत्ते शोधले जात आहेत. विशेष म्हणजे वसाहतीत वसाहतधारकांच्या घर, प्लॉट, घरकुल, कृषिपंप यांचे प्रश्न अधिक आहेत. त्यामुळे ग्रामविकासाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. निवडणुकीस अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आता पुढील बजेटकडे लक्ष केंद्रित केले आहे.
तळोदा तालुक्यातील लक्षवेधी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:23 AM