लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : गावे पाणीदार करण्यासाठी तालुक्यातील अबालवृद्धांनी कंबर कसली असून, वॉटरकप स्पर्धेला 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून शुभारंभ झाला. या स्पर्धेत तालुक्यातील 38 गावांनी सहभाग घेतला आहे.सिने अभिनेता आमिरखान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणा:या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेची 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. या योजनेंतर्गत गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानास सुरूवात केली आहे. नवानगर, लंगडी येथे गावातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोल वाद्याच्या घोषात व गाणी म्हणत श्रमदानाला सुरूवात केली. भोंगरा येथे किशोवयीन मुलींच्या गटाने गाव पाणीदार करण्याचा निर्धार करून भरदुपारी रणरणत्या उन्हात श्रमदान केले. मुलींचा हा उत्साह पाहून इतरांनीही श्रमदानात सहभाग घेतला. तालुक्यातील वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या 38 गावांपैकी नवानगर, लंगडी, भोंगरा, भुलाणे, काकरदा दिगर, बोराळे-मातकुट, बामखेडा, सुलतानपूर आणि वाडी पुनर्वसन या आठ गावांनी 8 एप्रिलपासून श्रमदानास सुरूवात केली. सी.सी.टी., नाल्यात दगडी बांधकाम, कंपार्टमेंट बंडींग, शोषखड्डे, रोपे तयार करणे आदी कामे या सर्व गावांमध्ये श्रमदानातून करण्यात येत आहेत.पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रकाश सोनवणे, गुणवंत पाटील, वॉटरकप स्पर्धेतील गावा-गावात जावून ग्रामस्थांना श्रमदानाबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन करीत आहेत. वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या 38 गावातील 180 लोकांनी पाणी फाऊंडेशनचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थीनी गावातील इतर ग्रामस्थांना प्रशिक्षण देवून गावे पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात बालगोपालांसह तरूण, ज्येष्ठ नागरिकही सहभागी होत आहेत.
ग्रामस्थांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग : शहादा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:11 PM