नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात पती-पत्नी दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडून सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे. सकाळी पती तर सायंकाळी पत्नीच्या प्रचारफेऱ्या होत आहेत. यासाठी कुटुंबातील सर्वच जण निवडणूक प्रचारासाठी फिरत आहेत. एकाच कुटुंबात निर्माण झालेला निवडणूक उत्साह पाहून ग्रामस्थही अवाक झाले आहेत. यात येणारे-जाणारे प्रत्येक जण त्यांना बस तुमेच शेत, बाकी तुमना समोर कोनी नई, बठी ग्रामपंचायत निवडणूकमा तुमनीच चर्चा शे, असे सांगून त्यांची फिरकीही घेत आहेत. गावातही पती-पत्नीचा विजय होणार किंवा नाही यावरच अधिक चर्चा रंगत आहेत.
यांचे पाहून त्यांच्याही गुडघ्याला बाशिंग
एकीकडे ६४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरु असताना जुलैपर्यंत होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाचीही चर्चा सुरु झाली आहे. जवळच्या गावांमध्ये निवडणुका सुरु असल्याने आपल्या गावात कधी, असा प्रश्न अनेकांना होता. याचा उलगडा प्रशासनाने केला आहे. यातून जुलै महिन्यात जिल्ह्यात पुन्हा निवडणुका आहेत. दरम्यान शहादा तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात यंदा निवडणूक आहे. या निवडणुकीचा वारा लागून अंगात वारं आलेल्या एकाने थेट मोबाईलवर आपण उमेदवारी करणार असून दारुची बाटलीच चिन्ह म्हणून मागणार असे पोस्टर तयार करुन फिरवणे सुरु केले आहे. त्याच्या या अफलातून चाळ्याला गावोगावचे शेकडो लाईक्स मिळत आहेत. त्याचे पाहून गावातील इतरांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असून आम्ही निवडणूक लढवणार असे जाहीर केलेले आहे. या उतावळ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतल्याची गावामध्ये एकच चर्चा सुरु आहे.
बठासले नोकऱ्या दी दिसू...
निवडणूक म्हणजे आश्वासन आणि आश्वासन म्हणजे निवडणुकीत विजय असा एक पारंपरिक समज आहे. ग्रामीण स्तरावरच्या निवडणुकीत कोण काय, आश्वासन देईल याचा भरवसा नाही. सध्या गावोगावी आश्वासनांची गाजरं दिली जात असताना, शहादा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने मी निवडी ऊनू तर गावमधला बठा पोरेस्ले, गव्हर्नमेंट नोकरी लाई दिसू, अशी वल्गना केली जात आहे. उमेदवाराच्या या भन्नाट कल्पनेवर गावातील युवक उमेदवाराची येता-जाता शाळा घेत आहेत. यात एकाने त्याच्याकडे माले कलेक्टर बनाडी दीस असे सांगून त्याची मजा घेण्याचा प्रकार सुरु ठेवत उमेदवाराला सळो की पळो करुन सोडले आहे.