नंदुरबार : भरधाव दुचाकी आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना नंदुरबार-खांडबारा रस्त्यावरील खामगाव फाट्याजवळ शनिवारी सकाळी घडली. नंदुरबार तालुका पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात निकम टेडग्या वसावे (वय २९, रा. धडगाव) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप वसावे हा युवक जखमी झाला. पोलिस सूत्रांनुसार सकाळी ७ वाजता नवापूर आगाराची बस (क्र. एमएच- ४०, एन- ९०२७) मोलगीहून नवापूरकडे निघाली होती.
सकाळी ११ वाजता नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर खामगाव फाट्याजवळ दुचाकी आणि बस यांच्यात धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दोघे युवक अपघातानंतर रस्त्यावर जोरदार आदळल्याने मोठ्या प्रमाणावर त्यांना मार लागला. निकम वसावे याला गंभीर जखमा होऊन त्याचा रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप हा युवक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. गंभीर झालेल्या युवकाला स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंदुरबार शहर व तालुका पोलिस ठाण्याचे पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य केले. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.