लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शहराबाहेर लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या नवीन बसस्थानकात चालक-वाहकांसाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे या बसस्थानक इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू आहे. याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने आता बसस्थानक कार्यान्वित होण्याची आशा मावळली आहे.स्व.पी.के. अण्णा पाटील हे 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना शहादा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर मामाचे मोहिदे शिवारात नवीन बसस्थानक मंजूर झाले होते. सध्याचे बसस्थानक अपूर्ण पडत असल्याने नवीन व सुसज्ज बसस्थानक व्हावे, असे त्यामागील धोरण होते. त्यासाठी मोहिदा शिवारातील जमीन खरेदी करून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे भव्य बसस्थानकाचे काम झाले आहे. मात्र हे बसस्थानक शहरापासून लांब असल्याने प्रवासी संघटना व प्रवाशांनी हे नवीन बसस्थानक सुरू करण्यास विरोध केला. मात्र परिवहन महामंडळाने हा विरोध न जुमानता काही ठिकाणच्या बसफे:या नवीन बसस्थानकावरुन सोडण्यास सुरुवात केली होती. मात्र नवीन बसस्थानकावरून पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बसेस पुन्हा जुन्या बसस्थानकात येत होत्या. महिनाभरात डिङोलचा खर्च वाढल्याने आगाराचे नुकसान होऊ लागले होते. त्यामुळे नवीन बसस्थानकावरून बसेस सोडणे एस.टी. महामंडळाला बंद करावे लागले. त्यानंतर या बसस्थानकात पुन्हा शुकशुकाट जाणवू लागला. या बसस्थानकाचा काहींनी रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी वापर सुरू केला. बसस्थानकातील फरशी, लोखंडी ग्रील व इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रकारही सुरू झाले. मात्र आता याठिकाणी चालक-वाहक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने करोडो रुपये खर्च करून अनेक वर्षापासून निरुपयोगी ठरलेल्या या इमारतीचा वापर सुरू होणार आहे.
शहाद्यातील बसस्थानक बनणार एस.टी.चे प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:32 AM