लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणूंच्या दुसऱ्या लाटेमध्ये एस. टी. महामंडळाने परराज्यांतील प्रवासी बसेस बंद केल्या होत्या. या निर्णयामुळे गुजरात व मध्यप्रदेशतील फेऱ्यांवर परिणाम झाला होता. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता पुन्हा गुजरातमधील फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
शहादा शहरातील मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक व नागरिक जवळील गुजरात राज्यामध्ये खरेदीसाठी जात असतात. मात्र, कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने बसेस बंद होत्या. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना गुजरात राज्यात खरेदीसाठी जाणे अवघड होत होते तसेच जास्तीचे पैसे मोजून खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत होता. मात्र, आता शहादा आजारातून गुजरातमधील बसेस सुरू झाल्याने व्यावसायिक व प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. दररोज सकाळी शहादा-सूरत, शहादा-अहमदाबाद, शहादा-वापी व शहादा-बडोदा या बसफेऱ्या आगाराच्यावतीने सुरू करण्यात आल्या आहेत.
परराज्यात जाणाऱ्या बसेस
शहादा-सुरत
शहादा-वापी
शहादा-अहमदाबाद
शहादा-बडोदा
सुरत गाड्या फुल्ल
निर्बंध म्हटल्यानंतर सुरत गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येने व्यावसायिक व प्रवासी गुजरात राज्यात जात असल्याने या फेरीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज सकाळी ६.३० वाजता व दुपारी १२.३० वाजता सुरत जाण्यासाठी शहादा आगारातून बस सुटत आहे.
९५ टक्के वाहक व चालकांचे लसीकरण पूर्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजूनही कायम आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सर्वांनी करणे आवश्यक आहे. शहादा आगारातील ३३९ वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
शहादा शहरातून गुजरात राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोरोना काळात सर्वत्र बसफेऱ्या बंद झाल्याने सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गुजरात राज्यात जाण्यासाठी शहादा आगारातून कोविड नियमांचे पालन करत पूर्वीप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
- योगेश लिंगायत, आगार प्रमुख, शहादा