लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी कांदा आवक कमी होऊनही दर स्थिर होते़ गुरुवारी मार्केट यार्डात २०० कट्टे कांदा आवक झाली़ छोट्या आकाराच्या या कांद्याला प्रती क्विंटल ४ ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर देण्यात आला आहे़कांदा दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत़ राज्यातील बाजारपेठेत कांद्याला विक्रमी दर मिळत आहेत़ नाशिक जिल्ह्यातील बाजारात कांद्याची आवक होत असल्याने दरांमध्ये वेळोवेळी वाढ होत असल्याचे चित्र असताना मात्र नंदुरबार जिल्ह्यात कांदा आवक दिवसेंदिवस कमी होत आहे़ सोमवारपासून सुरु झालेल्या बाजारात पहिल्या दिवशी ३५०, मंगळवारी ३००, बुधवारी तब्बल ४०० तर गुरुवारी मात्र केवळ २०० कट्टे कांदा आवक झाली़ २० ते ३० किलोच्या या कट्ट्यांमध्ये आकाराने लहान असलेला हा कांदाही व्यापारी दर देऊन खरेदी करत आहेत़ गुरुवारी पूर्व भागासह पश्चिम पट्ट्यातील गावांमधून येथे कांदा आवक झाली होती़ कांदा आवक कमी झाल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना ६ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला होता़ उर्वरित शेतकºयांना ४ ते ५ हजारादरम्यान देण्यात आला़ जिल्ह्यात नवापुर आणि शहादा येथील बाजारातही कांद्याची आवक होत नसल्याने व्यापारी बाहेरुन कांदा आवक करुन घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे़नवापुर तालुक्यात उत्पादित होणाºया कांद्याची विक्री येथील शेतकरी गुजरात आणि मुंबईच्या बाजारात करत आहेत़ तसेच साक्री तालुक्यालगतच्या भागात कांदा हा पिंपळनेर येथे विक्रीसाठी पाठवला जात आहे़ यातून या बाजारपेठा कांद्याविनाच असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे़ नंदुरबार तालुक्यात कांदा काढणीच्या कामांना वेग देण्यात आला असला तरी येथून मोजकाच कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळातही कांदा दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे सांगण्यात आले आहे़
कांदा आवक कमी झाल्याने दरांमध्ये स्थिरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:52 PM