नंदुरबार : स्वच्छता सर्व्हेक्षणात नंदुरबार पालिकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपले स्थान सुधारले आहे. राज्यात ४४ व्या स्थानावरून ३३ वे स्थान मिळवले आहे. तर देशात १८० व्या स्थानावरून १२२ वे स्थान मिळविले आहे. पालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपाययोजनेमुळे हे शक्य झाल्याचा पालिकेचा दावा आहे. दरम्यान, पुढील वर्षी राज्यात पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.स्वच्छ शहरांची यादी नुकतीच घोषीत करण्यात आली आहे. या यादीत नंदुरबारने उत्तूंग भरारी घेतली आहे. राज्यस्तरावर ११ रॅन्कची सुधारणा झाली तर देशपातळीवर ५८ रॅन्कची सुधारणा झाली आहे. यामुळे पालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील वर्षी पहिल्या दहा शहरात येण्यासाठी पालिकेचा पुरेपूर प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.हगणदारीमुक्ती...शहरात ज्या कुटूंबाकडे शौचालय नाही अशा कुटूंबांची अर्थात घरांचे सर्व्हेक्षण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यात जवळपास १३०० कुटूंबे शौचालय नसलेली आढळून आली होती. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने पालिकेला वर्षभरात १३२० वैयक्तिक शौचालये बांधकाम करण्याचे टार्गेट दिले होते. त्या सर्व कुटूंबांना शासनाच्या हिस्स्याचे अनुदान देण्यात आल्यानंतर १३२० शौचालयांचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. त्यानंतरही काही कुटूंब आढळून आल्यानंतर त्यांनाही अनुदान देण्यात आले. त्यामुळे उद्दीष्टापेक्षा अधीक अर्थात १३५० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले. त्यांचा वापर होतो किंवा कसा याचेही सर्व्हेक्षण करण्यात आले.सार्वजनिक शौचालयेशहरात विविध भागात ५०० शिटचे सार्वजनिक शौचालये देखील आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षात बांधण्यात आलेल्या नवीन सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी कायमस्वरूपी राहू शकेल याची काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत अशा ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.घंटागाडीचा प्रयोगशहरातील कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या १० वर्षांपासून घंटागाडीचा उपक्रम सुरू केला आहे. काही भागात दररोज तर काही भागात एक दिवसाआड घंटागाडी जावून कर्मचारी घरोघरी जावून कचरा गोळा करतात. अगदी मोठ्या व उच्चभ्रू वस्तींपासून ते अगदी झोपडपट्टीत देखील घंटागाडी जात असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचºयाची समस्या सुटली आहे.भुमीगत गटारीचा प्रश्नशहरात भुमीगत गटारीचा प्रकल्प मात्र यशस्वी होऊ शकला नाही. आजही या प्रकल्पाअंतर्गत अनेक समस्या आहेत. थेट पाणी नळवा रस्त्यावरील शुद्धीकरण प्रकल्पात पोहचू शकत नाही. ठिकठिकाणी चेंबर फुटले आहेत. पाताळगंगा नदीमधून गेलेली ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी फोडण्यात आली आहे. यामुळे या भागात मोठी समस्या निर्माण झाली आहे.
राज्यात नंदुरबार पालिकेची ११ स्थानांची मजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:29 PM