नंदुरबार : बसस्थानकांच्या 200 मीटरच्या परिसरातील ‘नो पार्किग झोन’मध्ये लावण्यात येत असलेल्या खाजगी प्रवासी वाहने तसेच इतर वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याकडून देण्यात आले आह़े खाजगी वाहनधारकांच्या वाढत्या मुजोरीमुळे एसटी चालक व वाहकांना मोठय़ा प्रमाणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़बसस्थानकाच्या 200 मीटरच्या परिसरात खाजगी प्रवासी तसेच अन्य खाजगी वाहनांची पार्किग करण्यास मनाई आह़े ही नियमावली जुनीच असली तरी आता या पुढे याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना महाव्यवस्थापकांकडून सर्व आगारप्रमुखांना देण्यात आल्या आहेत़ अनेक वेळा खाजगी वाहनधारकांच्या एजंटकडून बसस्थानकांवर दिवसभर ठिय्या मांडण्यात येत असतो़ तसेच बसस्थानकावरील प्रवाशांकडे आपल्या वाहनातूनच प्रवास करण्यासाठी तगादा लावण्यात येत असतो़ यामुळे अनेक वेळा प्रवासीदेखील त्रस्त होत असतात़ खाजगी एजंटकडून अशा प्रकारे प्रवाशांची पळवा-पळवी करण्यात येत असत़े त्यामुळे संबंधित आगाराच्या भारमानावर याचा परिणाम होत असून एसटीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत असत़े खाजगी प्रवासी वाहनधारकांची गेल्या काही दिवसांपासून दादागिरी वाढली आह़े नंदुरबार आगारात सर्रासपणे आपली वाहने उभी करुन प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यात येत असत़े अनेक वेळा प्रवाशांची इच्छा नसतानाही एजंटकडून लावण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे त्यांना अखेर खाजगी वाहनांमधूनच प्रवास करावा लागत असतो़ नंदुरबार बसस्थानकाच्या आत व बाहेर जाण्याच्या मार्गामध्येच खाजगी वाहनधारकांकडून आपली वाहने लावण्यात येत असतात़ त्यामुळे अनेक वेळा एसटी बसच्या चालक तसेच वाहकांना बसेस् आत आणतांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो़ यातून अनेक वेळा अपघातदेखील होत असतात़ त्यामुळे चालक व वाहकांकडून अनेक वेळा याबाबत आगार प्रशासनकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या आहेत़
प्रवाशांची पळवा-पळवी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 3:05 PM