लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळी महाजनादेश यात्रेनिमित्त नंदुरबारात येत असल्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपने केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने देखील बंदोबस्ताच्या तयारीला अंतिम रूप दिले. दोंडाईचा ते नंदुरबार या दरम्यान वाहनांची रिहर्सल घेण्यात आली. दरम्यान, वाघेश्वरी चौफुलीवरील अर्धवट तयार केलेल्या रस्त्यावरूनच मुख्यमंत्र्यांना आणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी नंदुरबारात येणार आहेत. त्यांची जाहीर सभा सायंकाळी सात वाजता बाजार समितीच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे. दोंडाईचा येथील सभा आटोपून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नंदुरबारात रस्ता मार्गाने येणार आहे. दोंडाईचा-नंदुरबार रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले आहे. परंतु पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर काठोबा देवस्थानाजवळील एक फरशीपूलाचा भराव खचला आहे. तेथे तात्पुरूती डागडूजी करण्यात आलेली आहे. याशिवाय वावदनजीकचा पूलावरील भराव देखील समांतर करण्यात आला आहे. या रस्त्यावरून वाहनांची रिहर्सल करण्यात आली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसह सुरक्षा वाहनांचा ताफा यांचा समावेश होता.दरम्यान, भाजपतर्फेही महाजनादेश यात्रेची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. सभा रात्री होणार असल्यामुळे सभास्थळ आणि परिसरात अंधार राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते या ठिकाणी येतील याकरीता जिल्हाभरातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.नंदुरबारात भोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह यात्रेतील प्रमुख मान्यवरांची जेवनाची सोय रात्री नंदुरबारात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे. भोजननंतर महाजनादेश यात्रा पुन्हा धुळ्याकडे रवाना होणार आहे. पालिकेतर्फे या भागातील सर्व पथदिवे, हायमस्ट, मिनीहायस्ट लाईट यांची दूरूस्ती करून ते सुरू करण्यात आले आहेत. स्वच्छता देखील करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे देखील बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. दोंडाईचा मार्गाने शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्याचे अर्थात भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुलीर्पयतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. पर्यायी असलेल्या रस्त्यावर प्रचंड चिखल साचला असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करून मुरूम टाकण्याचे काम करण्यात आले. परंतु दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे त्या कामावरही पाणी फेरले. त्यानंतर अर्धवट तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा वाहनांचा ताफा जाईल याची रिहर्सल करण्यात आली. ती यशस्वी ठरली. त्यानंतर हा रस्ता पुन्हा बंद करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा दौरा शासकीय नसून पक्षीय असला तरी प्रोटोकॉल म्हणून प्रशासनाला अलर्ट राहावे लागणार आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छोरींग दोरजे यांनी मंगळवारी नंदुरबार व शहाद्यात भेट दिली होती. याशिवाय विभागीय महसूल आयुक्तांकडून देखील वेळोवेळी दौ:याबाबत माहिती जाणून घेतली जात आहे.