लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंगळबाजारातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज चोरून नेला. याशिवाय याच भागातील तीन ते चार दुकानांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री चोरट्यांनी दिलेली सलामी पोलिसांना आव्हान ठरली आहे.मंगळबाजार व्यापारी संकुलात विविध वस्तू विक्रीची दुकाने आहेत. त्यातील ओळीने तीन दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी चोरी केली. प्रकाश गुरुबक्षाणी यांचे प्रकाश किराणा दुकानातून चोरट्यांनी तेलाचे डबे, ५० किलो साखर, रोख रक्कम लंपास केली. शेजारच्या महेंद्र चौधरी यांच्या किराणा दुकानातून देखील चोरट्यांनी मसाल्याचे पाकिटे, खोबरेल तेल व इतर साहित्य चोरून नेले. शेजारील कलीम पटवे यांच्या कटलरी दुकानातून नेकलेस, पावडर, मंगळसूत्र व इतर सामान चोरून नेला. मोहम्मद बोहरी यांच्या जडीबुटी दुकानातून देखील चोरीचा प्रयत्न झाला.गंगाबाई तांबोळी यांच्या पान दुकानातूनही काही मिळते का याचा प्रयत्न चोरट्यांनी करून पाहिला. याशिवाय इतर दोन दुकानांकडेही त्यांनी चाल केली. सकाळी चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.हजारोंचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लॉकडाऊनमध्ये किराणा सामानाची तजबीज करून चोरट्यांनी पोलिसांना कडक सलामी दिल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
लॉकडाऊनच्या पहिल्याच रात्री चोरट्यांची जोरदार सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:22 PM