लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : इयत्ता पाचवीत शिकणा:या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या शिक्षकाला दोन विविध कलमांतर्गत प्रत्येकी 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी ठोठावली.यासंदर्भात हकीगत अशी की, केरळ येथील राजेश राजन नायर हा खापर येथील खाजगी शाळेत शिक्षक असून मुलांची इंग्रजी विषयाची शिकवणी घेतो. नायर रहात असलेल्या इमारतीतीलच एक पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होती. 12 सप्टेंबर 2016 रोजी नेहमीप्रमाणे शिकवणी झाल्यावर नायर याने इतर विद्याथ्र्याना सुटी देऊन पीडित मुलीस थांबवून घेतले व नंतर रुमचे दार लावून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी मुलगी लवकर घरी न परतल्याने मुलीच्या शोधात निघालेल्या मुलीच्या आईला मुलगी शिक्षकाच्या घरातून रडत बाहेर पडताना दिसली. आईने मुलीस काय झाले असे विचारता मुलीने आईकडे आपबिती कथन केली.यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन शहादा येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. या खटल्यात पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी एम.वाय. तुंगर, महिला पोलीस दर्शना गावीत, ए.पी.आय. जी.एम. न्हायदे, तपासी अधिकारी आर.डी. भावसार आदींची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाल्याने न्या.के.एल. व्यास यांनी आरोपीस लैंगिक अत्याचाराच्या आरोपात 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच लैंगिक बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये 10 वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीस दोन्ही शिक्षा एकाचवेळेस भोगावयाच्या असून दंडाच्या रकमेतून 4500 रुपये पीडितेस देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सरकार पक्षातर्फे जसराज संचेती यांनी काम पाहिले. तसेच नासीर पठाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
विद्यार्थीनीवर अत्याचार करणा:या शिक्षकाला 10 वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:46 PM