हिरालाल रोकडे।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : १२ वी सायन्सनंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट, जेईई व एमएचटीसीईटी या परीक्षा यंदाच्या वर्षी झालेल्या नाही. त्याचप्रमाणे या परीक्षा कधी होणार याची माहिती शासनाने जाहीर केलेली नाही. परिणामी त्या कधी होतील याची शाश्वती नसल्याने शासनाने बारावीचा निकाल जाहीर केला. मात्र यानंतर उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत कुठलेही नियोजन केलेले नाही अथवा स्पष्ट धोरण ठरविले नसल्याने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत.गत आठवड्यात सीबीएसई बोर्ड व एचएससी बोर्ड यांनी बारावीच्या तिन्ही शाखांचे निकाल जाहीर केले. कला वाणिज्य शाखांच्या पुढील प्रवेशाबाबत कुठलीही अडचण नसली तरी बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे. यंदा प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा झालेल्या नाही. परिणामी १२ वीनंतरचे वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण रखडते की, सीबीएसई अथवा एचएससी बोर्डाच्या प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी नुसार होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षांबाबत कुठलेही अधिकृत धोरण जाहीर झालेले नसल्याने संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालकांकडून व्यक्त केली जात आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात जाहीर होणारे बारावीचे निकाल तब्बल पावणे दोन महिन्यांनी १६ जुलै रोजी जाहीर झाला. येत्या १० दिवसात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आॅनलाईने वितरीत होण्याची शक्यता आहे. गुण आहेत, भविष्यातील प्रवेशाचे मानसिक नियोजनही तयार आहे. मात्र प्रवेश कसा घ्यायचा या विवंचनेत विद्यार्थी पालक आहेत. साधारणता मे महिन्यात या प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात व बारावीच्या निकालानंतर त्यांचा निकाल जाहीर केला जातो. १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी या परीक्षांमधली गुणसंख्या गुणवत्ता यादी महत्त्वाची मानली जाते. सध्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्रवेशाची प्रक्रिया या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र उच्च शिक्षणाचे सर्व प्रवेश रखडण्याची चिन्हे असल्याने प्रवेश निश्चित होऊन शिक्षण कधी सुरू होणार याची चिंता आहे.१२ वी विज्ञाननंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शाखांच्या उच्च शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होतात. मात्र लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. त्याचे नियोजन निश्चित नाही. परीक्षा होत नाही तोपर्यंत प्रवेश निश्चित होणार नाही. यामुळे उच्च शिक्षणाची कवाडे कधी उघडतील यावर भाष्य करणे कठीण आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञानाच्या गुणांवर प्रवेश होतात. मात्र नोटिफिकेशन नसल्याने या प्रवेशाचीही अनिश्चितता दिसून येते. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्च शिक्षणाच्या प्रवेशपूर्व परीक्षा व प्रवेशाबाबतच्या गोंधळाचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हे विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेशीत झाले तर कमी गुण असलेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे.१२ वी विज्ञानचा निकाल जाहीर झाला. येत्या १० दिवसात गुणपत्रिकाही मिळण्याची शक्यता आहे. मात्र उच्च शिक्षणाच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषि महाविद्यालयाचे प्रवेश रखडण्याची चिन्हे आहे. यासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे निकाल हातात आहे पण प्रवेशाचे काय या विचित्र मन:स्थितीत विद्यार्थी व पालक अडकले आहेत.१२ वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला भारतीय सैन्यदलात नोकरीची संधी असते. आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये प्रवेशासाठी दरवर्षी एन.डी.ए या राष्ट्रीय संरक्षण दलासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. देशपातळीवर ही परीक्षा होत असल्याने देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सेनेच्या तिन्ही दलात नोकरीची संधी असते. तीन ते चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरळ सैन्यदलात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून हमखास नोकरी मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून एनडीए अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यदलातील वैद्यकीय शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने येथून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. मात्र यंदा ही परीक्षाही झालेली असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
१२ वीनंतरची दिशा अस्पष्ट असल्याने विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:17 PM