रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका निवडणुकीत मागील पंचवार्षिक काळात काँग्रेससोबत असलेला ‘चौधरी गट’ काँग्रेसपासून विभक्त झाला आणि भाजपमध्ये गेला. त्यामुळे चौधरी गट आणि डॉ.विजयकुमार गावीत एकत्र आल्यामुळे भाजपची शक्ती वाढली होती. अशा स्थितीत नंदुरबार पालिका निवडणुकीत धोका होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकारणाचे नवे डावपेच खेळले. भाजपपासून नाराज असलेला शिवसेनेचा गट त्यांनी जोडला. शिवसेनेचे शहरात फारसे प्रभाव नाही याची जाणीव असतानाही त्यांनी अनेक संभाव्य धोक्यांचा विचार करून ही चतुराई केली. विशेषत: गेल्यावर्षी झालेल्या शहादा पालिकेच्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी या गटाला जोडले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांना काँग्रेससोबत घेऊन निवडणूक लढवली. त्यात एकूण 39 जागांपैकी पाच जागा शिवसेनेला दिल्या व 34 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दिले. अर्थात या युतीला शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांचा सुरुवातीला अधिकृत दुजोरा नव्हता. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखांवर सोडून पक्षाने अधिकृत जबाबदारी टाळली होती. परंतु युती झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचार काळात जसा या युतीला लोकांचा पाठींबा मिळाला तसा नेत्यांनीही त्याला मान्यता दिली. राज्यमंत्री दादासाहेब भुसे व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी स्वत: शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रभागात सभाही घेतली.नंदुरबार शहरात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वैयक्तिक प्रभाव व संपर्क दांडगा आहे. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा त्यांच्याभोवतीच केंद्रीत राहिला आणि त्याच बळावर त्यांनी यशही मिळविले. या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या 39 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस-शिवसेना युतीचा विजयी झाल्या. त्यात काँग्रेसचे 34 पैकी 24 तर शिवसेनेचे पाचपैकी चार जागा आल्या. काँग्रेसच्या यशापेक्षा शिवसेनेला ज्या चार जागा मिळाल्या त्याची चर्चा राजकारणात अधिक होत आहे. शिवसेनेचा वैयक्तिक प्रभाव की काँग्रेसच्या प्रभावाचा फायदा याबाबतही चर्चा रंगत आहे.अर्थात चर्चा काहीही असली तरी काँग्रेस आणि शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.
काँग्रेस-शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:27 PM