लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशातील जलोला येथे होऊ घातलेला बालविवाह चाईल्ड लाईन व धडगाव पोलीस ठाण्यातर्फे रोखण्यात यश आले. दोन्ही कडील मंडळीचे समुपदेशन करण्यात आले.दावल शा महिला उन्नती मंडळ संचलित चाईल्ड लाईन व धडगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे जलोला येथे बालविवाह होणार असल्याची सर्वप्रथम खात्री करण्यात आली. त्यामध्ये बालविवाह संदर्भात लग्नाची पत्रिका, मुलीच्या जन्माचा दाखला आणि ठिकाण या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणावर पोलीस यंत्रणा आणि चाईल्ड लाईन नंदुरबारच्या पथकांनी भेट दिली. तेथे दोन्ही पक्षांचे समुपदेशन करण्यात आले आणि संबंधित बालविवाह हा थांबवण्यात आला. दोन्ही पक्षांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाविषयी कल्पना देण्यात आली. याप्रसंगी चाइल्ड लाइन आणि दावलशा महिला उन्नती मंडळ तळोदा अध्यक्ष वंदना तोरवणे तसेच समुपदेशक मेघा पाटील, समन्वयक आशिष शेवाळे टीम सदस्य संदीप भामरे, सुरेश पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. बालकल्याण समिती अध्यक्ष विठ्ठलराव कदम तसेच महिला व बालविकास विभागाचे जाधव, लांडगे यांनी मार्गदर्शन केले.
बालविवाह रोखण्यात मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 12:39 PM