रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६४ गावांमध्ये सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचार बुधवारी थंडावला. दरम्यान बुधवारी तीन ठिकाणी भेटी देत पाहणी केली असता, या प्रचारात कोरोनाचा विसर पडला की काय असे चित्र यावेळी समोर आले. दरम्यान प्रशासनाकडून कोविड उपाययोजनांनुसार प्रचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम २०२० मध्ये सुरु झाला होता. यांतर्गत अर्ज छाननी व माघारीनंतर जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून ६४ ग्रामपंचायतीत सुरु झालेला प्रचार बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून थंडावला. या प्रचारादरम्यान कोविड नियमांनुसार वागण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिला होता. यात प्रामुख्याने एका मतदाराकडे सहापेक्षा अधिक जणांनी जावू नये, मास्क, सॅनेटायझर व हँडग्लोव्हजचा वापर करावा अशा सूचना केल्या होत्या. या सूचनानंतर ब-याच उमेदवारांनी पहिल्या दोन दिवसात त्यानुसार प्रचार केलाही परंतू मास्क घातल्यावर मतदार ओळखत नाही असा संभ्रम झाल्याने मग मास्क जावून विनामास्कच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान यांतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी कोपर्ली, भालेर आणि हाटमोहिदे या तीन गावांमध्ये सुरु असलेल्या प्रचारात सहभाग घेतला असता, त्याठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते हे विनामास्कच प्रचार करत असल्याचे दिसून आले. घरोघरी जावून मतदाराच्या पाया पडून मतदान करा म्हणून गळ घालणा-या या उमेदवारांकडून नंतर हात धुण्याचा उपक्रम ही होत नसल्याचे दिसून आले. गर्दीत एकमेकांपासून अंतर ठेवून राखणेही जमत नसल्याचे समोर आले. यात प्रामुख्याने एकमेकांसोबत अगदी बारीक आवाजात कुजबुज करत चालणा-यांची संख्याच अधिक होती. गावोगावी उपाययोजनांअभावी होत असलेल्या या प्रचारात बाहेरगावाहून निवडणूकीच्या मदतीला आलेल्यांचीही डोकेदुखी असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. अद्याप कोणात कोरोनाची लक्षणे दिसून आली नसली तरी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मतही काही ग्रामस्थांकडून यावेळी व्यक्त करण्यात आले.
कोविड नियमांनुसार सुरक्षा उपायांचा वापर करुन प्रचार करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कामकाज केले होते. मास्कचा वापर करण्यावर लक्ष देण्यात आले होते. गर्दीबाबत कोणतीही बंधने नव्हती. केवळ उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत सूचना होत्या. उमेदवारांनी त्या पाळल्या असल्याचे दिसून आले. - भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबार.
भालेर नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील चार प्रभागांच्या १३ सदस्यपदाच्या जागांसाठी एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांकडून प्रचारावेळी कोरोना उपाययोजनांचा विसर पडल्यागत प्रचार सुरु आहे.
कोपर्ली कोपर्ली ग्रामपंचायतीसाठी २३ उमेदवार रिगणात आहेत. गाव आणि प्रभाग मोठे असल्याने याठिकाणच्या प्रचार फे-या लक्षवेधी होत्या. प्रचारादरम्यान कोविड नियमावलीनुसार उपाययोजना करण्यात उमेदवार मागे होते.
हाटमोहिदाहाटमोहिदा गावाच्या तीन प्रभागात १८ उमेदवारांचा प्रचारही गर्दीत सुरु असल्याचे दिसून आले उपाय योजनांना फाटा देत एकावेळी पाचपेक्षा अधिक जण मतदारांच्या घरी जावून भेटी-गाठी करत असल्याचे समोर आले.