नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान येथील शासकीय आश्रमशाळेतील पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याला उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. सागर उत्तम वसावे (वय ६, रा. ओघाणी, ता. अक्कलकुवा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अचानक त्याची प्रकृती खराब झाल्याने आश्रमशाळा अधीक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते.
याठिकाणी डॉ. संतोष परमार यांनी त्याची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयत सागर वसावे याची बहीण याच आश्रमशाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. मंगळवारी स्वातंत्र्यदिनी भाऊ-बहिणीच्या भेटीसाठी त्यांचे काका आले होते. यावेळी दोघांनी गुजरात राज्यातील वडिलांसोबत गप्पा केल्या.
रात्री झोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास सागर वसावे हा अचानक बडबड करू लागल्याचे दिसून आले. त्याची प्रकृती खराब झाल्याने अधीक्षक सुनील देढे यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय गाठले. याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष परमार यांनी सागर याची तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बालकाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. बालकाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.