लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी टंचाईच्या कामांना आणि फाईलींना दोन दिवसांच्या आत मंजुरी द्यावी अशा सुचना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार तालुका आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.पाणी टंचाई तसेच इतर विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, उपसभापती ज्योती पाटील, जि.प.सभापती हिराबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागुल, अभियंता पी.सी.भांडेकर, सतीष वळवी, जगन्नाथ पाटील, विक्रमसिंग वळवी, बी.के.पाटील, डॉ.सयाजी मोरे, सुभाष राजपूत आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व इतर अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. भालेरसारख्या गावाला 12 ते 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. अनेक गावांना विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करूनही टंचाई कायम आहे. याबाबत बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, पाणी पुरवठय़ाच्या योजना, कामे आणि फाईलींना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिका:यांनी प्राधान्य दिले पाहिजे. दोन दिवसांच्या वर या कामांच्या फाईली पेंडींग राहू नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य देत टंचाई कृती आराखडय़ातील कामे तातडीने पुर्ण करावी. जेथे विहिर, विंधन विहिर अधिग्रहणाची गरज आहे तेथे त्या कराव्या. टंचाईच्या उपाययोजनांच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भालेर, उमर्दे, आक्राळे, वावद, सैताणे, काकर्दे, शिंदगव्हाण, लहान उमज, दुधाळे, शनिमांडळ, रनाळे, पिंपरी, नांदरखेडा यासह इतर टंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय घरकुल योजना, 14 वा वित्त आयोग यासह इतर कामांचा देखील आढावा घेण्यात आला.
टंचाईच्या कामांना प्राधान्य देण्याच्या नंदुरबारातील बैठकीत सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:10 PM