लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नातेवाईकाचा खून महिलेच्या पुतण्याने केल्याचा संशयातून चौघांनी महिला व तिच्या मुलांना मारहाण करीत घराची नासधूस केल्याच्या गुन्ह्यातील चौघांना धडगाव न्यायालयाने दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी : कात्रीचा कामोदपाडा, ता.धडगाव येथील रुग्याबाई बाज्या वळवी या महिलेच्या घरावर चार जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली होती. वेलखेडी येथील नातेवाईकाच्या मृत्यूस तुमच्या पुतण्याने केल्याचा आरोप करीत हा हल्ला करण्यात आला होता. त्यात घराचेही व घरातील सामानाचेही मोठे नुकसान करण्यात आले होते. याबाबत रुग्याबाई वळवी यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने ओल्या रुमा वळवी, नवल्या रुमा वळवी, सामा रुमा वळवी, मोग्या रुमा वळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र हवालदार यु.पी.रावताळे यांनी धडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केले होते. न्या. जोशी यांच्या कोर्टात याबाबतचा खटला चालला. सर्व साक्षीपुरावे आणि पुरावे लक्षात घेता न्या.जोशी यांनी ओल्या वळवी, नवल्या वळवी, सामा वळवी व मोग्या वळवी सर्व रा.कात्रीचा कामोदपाडा यांना दोषी ठरवत त्यांना नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.आर.बी.बि:हाडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सुरेश गावीत होते.
मारहाण व घराची नासधूस करणा:या चौघांना दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:44 PM