लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या पाच दिवसात मंदावली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमधील संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पावणेदोनशे एवढ्या जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत १५१ जण जिल्ह्यात क्वॉरंटाईन होते. यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताणही कमी होत आहे. शहादा व नंदुरबारची केंद्रे मात्र फुल्ल आहेत.जिल्ह्यात प्रत्येक तालुका मुख्यालयाला व इतर असे १२ क्वॉरंटाईन केंद्र करण्यात आले आहे. त्यात महिला व पुरुषांसाठी वेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या व मध्यंतरीच्या काळात क्वॉरंटाईन सेंटरमधील लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. गेल्या काही दिवसात मात्र तक्रारी कमालीच्या कमी झाल्या आहेत. सद्य स्थितीत नंदुरबार, शहादा येथील केंद्रात अधीक तर धडगाव व अक्कलकुवा केंद्रात एकही जण क्वॉरंटार्इं नसल्याची स्थिती आहे. तळोदा व नवापूर केंद्रातील संख्या मात्र वाढली आहे.जिल्ह्यात नंदुरबारात सर्वाधिक पाच क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात विमल हौसींग सोसायटीनजीक आदिवासी मुलांचे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह, समाज कल्याण विभाग मुलींचे वसतिगृह, पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह आणि हॉटेल गौरव पॅलेस यांचा समावेश आहे.शहादा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह, मोहिदारोड, शहादा. नवापूर येथे आदिवासी सेवा सहायक शिक्षण प्रसारक संस्थेचे वसतिगृह व जयहिंद छात्रालय. तळोदा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह- आमलाड, अक्कलकुवा येथे जवाहर नवोदय विद्यालय इमारत, खापर येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह तर धडगाव येथे शासकीय आश्रम शाळा, मांडवी बुद्रूक यांचा समावेश आहे.लक्षणे कमी असल्यास...कोरोना संसर्गीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येते. अशा लोकांमध्ये कमी लक्षणे असल्यास किंवा त्यांना त्रास असल्यास त्यांचे स्वॅब घेतले जातात. ज्यांना काहीही त्रास नाही अशांची आरोग्य तपासणी केली जाते, आवश्यक वाटल्यास स्वॅब घेतला जातो. आठ ते १२ दिवस अशा लोकांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेऊन त्यांना घरी सोडण्यात येते. त्यामुळे आता क्वॉरंटाईन सेंटरमधील संख्या कमी होऊ लागली आहे. पूर्वी सलग १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे आवश्यक राहत होते.तक्रारींची संख्या कमीक्वॉरंटाईन सेंटरमधील तक्रारींचे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे. पूर्वी आरोग्य तपासणी न होणे, स्वॅब घेतले न जाणे, कचरा आणि अस्वच्छता, पाण्याची समस्या असे प्रश्न राहत होते. त्याच प्रकारच्या सर्वाधिक तक्रारी देखील राहत होत्या.ही बाब लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरून स्थानिक प्रशासनांना कडक आदेश देण्यात आल्याने आता तक्रारींची संख्या अगदीच नगण्य झाली आहे. अर्थात ज्या ठिकाणी जास्त क्वॉरंटाईन आहेत अशा ठिकाणी काही कुरबूरी सुरूच असल्याचे चित्र आहे.गेल्या दोन दिवसात क्वॉरंटाईन सेंटरमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये केवळ दोन जणांचा समावेश आहे.
नंदुरबारात आणखी दोन खाजगी लॉजेसला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यात आली आहे. यात आदर्श लॉज व श्रीजी रेसीडेन्सी यांचा समावेश करण्यात आला आहे.शहाद्यात देखील खाजगी लॉज किंवा हॉटेलला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.शहाद्यातील कोविड कक्ष सुरू करण्यात आल्याने नंदुरबारातील दोन्ही कक्षावरील ताण बऱ्यापैकी कमी होणार असल्याचे चित्र आहे.