लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : धडगाव तालुक्यातील मोख-कडवीपाडा येथील महिलेस डाकीण ठरवून गावाबाहेर काढून दिल्याचा प्रकार घडला आहे़ या महिलेने प्रशासनाकडे धाव घेतली असून गावात सन्मानाने प्रवेश देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे़फुलांतीबाई भायजा पाडवी असे महिलेचे नाव असून त्यांनी पोलीस अधिक्षकांना याबाबतचे निवेदन दिले आहे़ निवेदनात महिलेने म्हटले आहे की, मोख गावात पशुंवर अज्ञात रोगाची साळ अलने तीन बैल मरण पावले़ गावातील काही लोकांनी या घटनेबाबत फुलांतीबाई यांना जबाबदार धरून डाकीण ठरवले़ फुलांतीबाई यांनीच बैल मारले असा अपप्रचार करुन बदनामी केली़ जादू टोणा करुन बैल मारुन टाकल्याची आवई उठवली होती़दरम्यान ३० जुलै रोजी गावातील सामा माकत्या पाडवी, विजय सामा पाडवी, कायगा माकत्या पाडवी, जंगल्या कागडा पाडवी, रामला सामा पाडवी, सामा राजा पाडवी, गणेश कागडा पाडवी यांनी महिलेकडे नुकसान भरपाईची मागणी करत गावातून हाकलून लावले होते़ ‘गावात राहिली तर घर जाळून टाकू’ असे सांगून गावातून हाकलून लावले होते़ याप्रकारानंतर धडगाव पोलीस ठाण्यात अर्ज देत न्याय देण्याची मागणी केली होती़ याचा राग येऊन काहींनी महिला आणि तिच्या कुटूंबियांना मारहाण करत गावातून पिटाळून लावले होते़ यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महिला नातलगांकडे राहून वेळ काढत आहे़ या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे़गावातून हाकलून लावलेल्या महिलेने सिसा ता़ धडगाव येथे कुटूंबासह नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे़ वेळोवेळी तक्रारी अर्ज देवूनही कारवाई होत नसल्याने अखेर महिलेने दोन आॅक्टोबर पासून धडगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे़ सोबत महिलेचे पती, मुले यांच्यासह सुकलाल वाहऱ्या पावरा, देविसिंग पावरा, दित्या पावरा आदीही सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे़
डाकीण ठरवून गावातून हाकलून दिलेल्या महिलेची प्रशासनाला साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 12:20 PM