यंदा जून व जुलै महिन्यांंत अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. सुरुवातीला पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तिसऱ्यांदा हीच परिस्थिती निर्माण होते काय, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल, अशी आशा लागली आहे. तालुक्यातील गोमाई नदी परिसरात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच आहे. शेकडो एकर जमीन बागायतीखाली येत आहे. शेतकरी मुख्यत: केळी, ऊस, पपई ही पिके घेतात. सातपुडा पर्वतरांगेतून येणाऱ्या सुसरी नदीवर दरा फाटालगत दरा धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे पावसाळ्यात थांबत असलेल्या पाण्याचा निचरा होऊन हजारो एकर शेतीच्या कूपनलिका व विंधन विहिरी जिवंत झालेल्या आहेत. पाण्याची पातळी वाढली असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यास लगतच असलेल्या गोमाई नदीच्या पात्रात पाण्याच्या विसर्ग करण्यात येतो. येथील शेतकऱ्यांची मुख्य मदार सुसरी धरणावर असल्याने गेल्या महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती. परंतु, आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडले असून त्यातून दोन हजार ४७९ क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
मध्य प्रदेश राज्यातून गोमाई नदीचा उगम झालेला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मध्य प्रदेशातील खरगोन गावालगत गोमाई नदीवर मोठे धरण बांधल्यामुळे नदीला येणारा महापूर हा आता थांबलेला आहे. सध्या सातपुडा पर्वतात झालेल्या पावसाचे पाणी नदी-नाले यांच्या माध्यमातून व गोमाई पात्रात आल्यास शहराला लागून असलेली नदी प्रवाहित होते. पूर्वी बारमाही वाहणारी गोमाई नदी आता केवळ तीन ते चार महिने वाहते. परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून गोमाई नदीवर ठिकठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधणे गरजेचे आहे.