लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : मुले पळविणा:या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरून शहरानजीकच्या गडद येथे दोन इसमांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. घटनास्थळी पोलीस वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गडद येथे दोन अज्ञात इसम दिसून आल्याने मुले पळविणारे असे समजून त्यांना नागरिकांकडून विचारणा करण्यात आली. संशयावरून त्यांना नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागून मार खावा लागला. पोलिसांनाही याबाबत अवगत करुन देण्यात आल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक संगीता कदम व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने दोघे बचावले. या दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आल्यानंतर ते दोघे मुले पळवून नेणारे नसल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान ही वार्ता शहरात वा:या सारखी पसरल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात तोबा गर्दी केली. मुले पळविणारे कोण आहेत? ते दिसतात कसे? पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे? हे जाणून घेण्यासाठी पुरुषांसह महिलांनीही एकच गर्दी केली. पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्यात आल्यानंतर गर्दी मागे फिरली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असून यामुळे अनेकांना विनाकारण मार खावा लागत आहे. पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सोशल मीडियावर संदेश पाठवून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नवापूर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुलांना चोरणारी टोळी आली आहे अशी अफवा सोशल मिडियावर शेअर होत आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांना नवापूर पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येते की, नवापूर शहरासह तालुक्यात कुठेही लहान मुलांना चोरून नेणारी टोळी अथवा चोरटे आलेले नाहीत. केवळ काही लोकांकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. तरी अफवांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारची संशयीत व्यक्ती मिळून आल्यास त्यांना मारहाण न करता नवापूर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे म्हटले आहे.
मुले पकडणारा असल्याच्या संशयावरून गडद येथे एकाला चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:37 PM