नंदुरबार : वावद लघु तलावातून वडिलोपर्जीत असलेल्या विहिरींमधून पाणी मिळावे, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा व कृष्णा पार्क कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी चौपाळे ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. चौपाळे शिवारातील कृष्णा पार्क व रिसोर्ट मध्ये ग्रामस्थांनी तोडफोड केली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रु धुराच्या नळकांडय़ा फोडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर ग्रामस्थांपैकी महिलेने व रिसोर्टच्या संचालकांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेप्रकरणी बुधवारी चौपाळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. जिल्हाधिका:यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून योग्य तो तोडगा काढण्याचे सांगितले. सकाळी 11 वाजता महिला व ग्रामस्थ नवापूर चौफुलीवर मोठय़ा संख्येने जमा झाले होते. महिलांच्या हातात हंडा होता. नवापूर चौफुलीहून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला. तेथे पोलिसांनी मोर्चेक:यांना अडविले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कृष्णा पार्क कायमस्वरूपी बंद करावे. वावद येथील प्रकल्पासाठी ज्या शेतक:यांच्या जमीनी संपादन करण्यात आल्या होत्या त्या शेतक:यांच्या वडिलोपर्जीत विहिर, कुपनलिका आहेत त्यामधून त्यांना शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी वापराकरीता परवाणगी देण्यात यावी. चौपाळे ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा ग्रामसभेच्या ठरावानुसार सोडविण्यात यावा. घडलेल्या घटनेतील अटक करण्यात आलेल्या ग्रामस्थ व शेतकरी यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. चौपाळे ही संतांची पावनभुमी आहे तिचे नाव बदनाम होणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी व सर्व संबधीत अधिकारी यांना वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोपही ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, वावद ग्रामपंचायतीनेही याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून रिसोर्ट बंद करण्याची मागणी केली.
चौपाळे ग्रामस्थांसह ‘स्वाभिमानी’चा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:32 PM