लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटूंबातील तिघे सदस्य कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोहोचली आहे़शहरातील एकास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली होती़ यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत कोरोनाबाधिताला विलगीकरण कक्षात तर त्याच्या कुटूंबियांना होळ तर्फे हवेली शिवारातील विलगीकरण कक्षात हलवले होते़ कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांचे स्वॅब नमुने जिल्हा प्रशासनाने घेतले होते़ यातील १४ जणांचा अहवाल प्राप्त झाला होता़ उर्वरित १७ जणांचे अहवाल शिल्लक होते़ यातील बाधिताच्या कुटूंबातील तिघांचा समावेश होता़ यात आई, मुलगा आणि मुलगी या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना तातडीने सिव्हीलमधील आयसोलेशन वॉर्डात हलवण्यात आले आहे़ दरम्यान बाधिताच्या पत्नीचे अहवाल नेगेटीव्ह आल्याची माहिती आहे़
कोरोनाबाधिताच्या कुटूंबातील तिघांचे स्वॅब रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 6:02 PM