लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील छोटा धनपूर येथील एकास विष प्राशन केल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याचा उपचार सुरु असताना मंगळवारी मृत्यू झाला होता़ मयतामध्ये कोरोनाचीही लक्षणे आढळून आली असल्याने अरोग्य विभागाने एकच धावपळ उडाली असून छोटा धनपूर येथे सर्वेक्षण करत चौघांना होम तर तिघांना आमलाड येथील क्वारंटाईन कक्षात रवाना करण्यात आले आहे़छोटा धनपुर येथील २८ वर्षीय युवक गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजूरीसाठी गेला होता़ २० रोजी तो छोटा धनपूर येथे आला होता़ दरम्यान चार दिवस व्यवस्थित राहिल्यानंतर त्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ त्याला उपचारासाठी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़ रेखा शिंदे यांनी रुग्णाच्या प्रवासाची माहिती घेत त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले होते़ याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता़ दरम्यान मयत युवकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने याबाबत तालुका आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर तालुका आरोग्य विभाग व इतर विभागांकडून तातडीने कारवाई सुरु करण्यात आली आहे़ यांतर्गत तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे, डॉ़ रेखा शिंदे यांनी छोटा धनपूर येथे ग्रामस्थांची भेट घेत माहिती जाणून घेतली आहे़ छोटा धनपूर येथील या प्रकाराने या भागातील गावांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे़वैद्यकीय अधिकारी डॉ़ पंकज पावरा, आरोग्य सेवक आरक़ेक़ाळे, नरेश पावरा, संदीप शेलार, आरोग्य सेविका डी़पी़मसूरकर, आशा शकीलाबाई पवार, सुरेखा चौधरी, अंगणवाडी सेविका शकुंतलाबाई माळी, विमलबाई पिंपळे यांनी गावात सर्वेक्षण मोहिम राबवत ग्रामस्थांच्या तपासण्या केल्या़दरम्यान आरोग्य पथकांतील गावातील २९१ घरांमधील १ हजार ७०० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे़ यात कोणासही ताप, सर्दी, खोकला, घसा दुखी आदी लक्षणे नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत गावात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे़ मयत व्यक्तीच्या अती संपर्कात असलेल्या कुटूंबातील तिघांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात तर चार जणांना गावातील त्यांच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ मयत व्यक्तींच्या स्वॅब रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे़ मयत युवकाने आत्महत्या का, केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही़
विष प्राशन करणाऱ्यात दिसून आली कोरोनाची लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:59 PM