रविवारी सर्वच तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यातून मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील विविध विभागांतील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मकर संक्रांतीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना तालुकास्तरावर बोलावून बॅलेट मशीन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी मशीन्सची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला.
दरम्यान, शहादा तालुक्यातील सर्वाधिक २१ गावांमध्ये मतदान होणार आहे. एकूण ७१ प्रभागांत होणाऱ्या मतदान कार्यक्रमासाठी रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. याखालोखाल धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण हाेणार आहे. सुमारे २५ हजार मतदारांना मतदान करता यावे यासाठी तालुका प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तळोदा तालुक्यातील २३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रियेचे नियोजन प्रशासनाने केले आहे. नवापूर तालुक्यातील ३५ प्रभागांतील मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पथक नियुक्त
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथक नियुक्त करण्यात आले असून, हेच पथक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत असून, त्याठिकाणी गैरप्रकार घडू नये यासाठी नियंत्रण ठेवत आहे. हेच पथक निवडणुकीच्या दिवशीही संबंधित केंद्रांना भेटी देणार आहे.