नंदुरबार : जिल्ह्यात सहावी ते दहावीला अध्यापन करणाऱ्या सर्व महिला शिक्षिका, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडीसेविका यांच्यासाठी डिजिटल माध्यमाद्वारे मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणास जिल्हातील महिलांनी प्रतिसाद दिला.
मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी ‘स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय’ राष्ट्रीय अभियानांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाकडे लक्ष वेधले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि युनिसेफ यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.वर्षा फडोळ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. राठोड, पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रसंगी वसुमना पंत यांनी या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुली, तसेच माता पर्यंत हा विषय पोहोचविण्याचे आवाहन केले.
डॉ.वर्षा फडोळ यांनी मासिक पाळी या विषयावर वैद्यकीय दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती सांगून उपस्थितांशी संवाद साधला.
के. एस. राठोड यांनी मासिक पाळी हा संवेदनशील विषय आहे, या विषयाबाबत गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत, त्याचे निराकरण करावे, असे सांगितले.
डॉ.कमलादेवी आवटे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. मच्छिंद्र कदम यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी या विषयाची माहिती घेऊन शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचविण्याचे आवाहन केले. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांनीही मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती देऊन, दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ जास्तीतजास्त महिलांनी घेण्याबाबत सांगितले. कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डाएटच्या अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार, विषय सहायक प्रकाश भामरे, नरेंद्र पाटील, गायत्री पाटील, सीमा पाटील यांनी काम केले. युनिसेफमधून अपर्णा कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना विषयानुसार केस स्टडी सांगून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.वनमाला पवार यांनी केले.
दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषय घेण्यात आले. त्यात मी माझे शरीर व समता, मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीबद्दलच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती, मासिक पाळी संदर्भात निर्माण होणारी आव्हाने व उपाय, मासिक पाळी काळात स्वच्छता पाळण्याच्या पद्धती व आरोग्यदायी सवयी, मासिक पाळीच्या काळात शोषक साहित्याचा वापर, किशोरवयीन मुलीबरोबर संवाद व सकारात्मक वातावरण निर्मिती यांसह, सगळ्यात शेवटचे सत्र म्हणजे ज्या महिला प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले, त्यांची येथून पुढे भूमिका काय असेल, याविषयी रोडमॅप ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिला शिक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका यांनी सहभाग नोंदविला.
यशस्वितेसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण व विषय सहायक संदीप पाटील, प्रकाश भामरे डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता बी.आर.पाटील, पंढरीनाथ जाधव, डॉ.संदीप मुळे यांनी परिश्रम घेतले.