तळोदा : तळोदा तालुका तंटामुक्ती समितीची बैठक बुधवारी पोलीस ठाण्यात झाली. या वेळी ट्रिपल सीट मोटारसायकल चालविणाऱ्यांवर सक्त नजर ठेवण्याच्या सूचना जिल्हा उपपोलीस अधीक्षक शिवाजी सावंत यांनी उपस्थित पोलीस पाटलांना दिल्या.
पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, फौजदार अभय मोरे, अमितकुमार बागुल, सदस्य गणेश मराठे उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यात ट्रिपल सीट मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण शहरात तर वाढले आहेच; त्याबरोबर ग्रामीण भागातदेखील खूपच वाढले आहे. शिवाय नाबालिक चालकांचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी ग्रामीण भागात पालकांबरोबरच पोलीस पाटलांनीही पुढे आले पाहिजे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. पोलिसांनीही अशा चालकांवर कारवाई हाती घेतली आहे. याबाबत वाहनधारकांमध्ये नाराजी आहे. संभाव्य अपघाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कार्यवाहीतील दोनशे रुपयांचा दंड हा सरकारदरबारी जमा होतो. हा निधी वेगवेगळ्या अपघातांत बळी ठरलेल्या कुटुंबांना दिला जातो. त्यामुळे चालकांनी शासनाच्या मोटार वाहन कायद्याला धरूनच वाहन चालविणे आवश्यक आहे. म्हणून वाहनधारकांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त न करता नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
या वेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते. या दरम्यान तहसीलदार गिरीश वखारे व पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
तालुक्यातील पोलीस पाटलांचे गेल्या दोन महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. साहजिकच ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे तब्बल दोन महिन्यांचे मानधन ठरले असूनदेखील ते ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे राखत आहेत. मात्र त्यांचे मानधन नियमित केले जात नसल्याने पोलीस पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तळोदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडितराव सोनवणे यांचा संकल्पनेतून ग्रामीण पोलीस पाटलांनी आपल्या संघटनेमार्फत निधी गोळा करून ड्रेस कोड, ओळखपत्र उपलब्ध करून दिल्याने पोलीस उपअधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले.