मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंजुर असलेले वैद्यकीय महाविद्यालय आता दृष्टीक्षेपात येवू लागले आहे. केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. केंद्राकडून १६० कोटी रुपयांचा निधी देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल अशी अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. खासदार तथा केंद्रीय आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सदस्या डॉ.हिना गावीत यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय दोन वेळा मंजुर झाले आहे. पहिल्या वेळी आवश्यक सुविधा आणि पुरेशा बेडचे रुग्णालय नसल्याने महाविद्यालयाची मंजुरी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावसह नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय नव्याने मंजुर केले होते. जळगावचे महाविद्यालय सुरू झाले, परंतु नंदुरबारचे महाविद्यायलय मृगजळ ठरते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु गेल्या वर्षी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता अर्थात डीन यांचीही नियुक्ती करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग करण्यात आले. इमारतीचीही सुविधा निर्माण केली गेली. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची आशा पुन्हा जागृत झाली.गेल्याच महिन्यात केंद्राच्या समितीने भेट देवून महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात चाचपणी केली. या समितीने काही त्रुट्या काढल्या आहेत. त्या लागलीच दूर करण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे. त्रुटी या केवळ इन्फास्ट्रक्चरच्या आहेत. अर्थात क्लासरूम, विविध विभागांच्या प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. त्यांची पुर्तता ३० दिवसात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वैद्यकीय महाविद्यालयासाठी १६० कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. खासदार डॉ.हिना गावीत या त्यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीने देखील आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी सुचीत केले आहे. आवश्यक तो अधिकारी व कर्मचारी वर्गाची पुर्तता ७० टक्के झालेली आहे. ३० टक्के भरती ही सरळ सेवेने करणे किंवा इतर ठिकाणाहून समायोजन करणे या पद्धतीची राहणार आहे.या सर्व बाबी लक्षात घेता येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष एमबीबीएस प्रवेश सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी ३० दिवसात पूर्ण करण्याचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:43 AM