लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मंगळवारपासून हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या महिन्यात मंदिरांवर भाविकांची पूजाअर्चा व उपासनेसाठी गर्दी होते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे प्रशासन व संबंधित मंदिराचे विश्वस्त यांनी समन्वय साधून व नियमावली तयार करून श्रावण महिन्यात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून धार्मिकस्थळे व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. शासनाने लॉकडाऊननंतर मंदिरे, धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे यांच्याबाबत काही प्रमाणात अटी आणि शर्ती लावून शिथीलता दिली आहे. पण अद्यापही अनेक मंदिरे केवळ सकाळी व सायंकाळी पूजाविधीसाठी उघडतात व पुन्हा बंद करतात. मंगळवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून प्रशासन व मंदिर विश्वस्तांनी नियमावली तयार करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी मंदिरांवर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्स पाळले गेले पाहिजे, प्रत्येक भाविकाच्या तोंडाला मास्क हा सक्तीने असला पाहिजे, प्रत्येक मंदिर ट्रस्टने दररोज तीनवेळा मंदिराच्या परिसरात फवारणी करावी, मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी सॅनिटायझर ठेवावे, भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सची आखणी करावी आदी प्रकारचे नियोजन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील प्रकाशा हे दक्षिणकाशी म्हणून प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील केदारेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी गर्दी होते. परप्रांतातील भाविकही दर्शनासाठी येतात. तसेच जयनगर येथील हेरंब गणेश मंदिर, सारंगखेडा येथील दत्त मंदिर, पिंगाणे येथील गोमाई नदीकाठावरील नागेश्वर महादेव मंदिर, खेड येथील कोचरा माता मंदिर, शहादा येथील पुरातन पंचमुखी महादेव मंदिर, रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर आदी धार्मिकस्थळे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिरांवर भाविकांची गर्दी होते. काही भाविक महिनाभर पूजाअर्चा व उपासना करतात. त्यामुळे त्या त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलीस विभाग, प्रशासन व मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधून स्वतंत्र नियमावली करून धार्मिक स्थळे खुली करावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
नियमावली बनवून मंदिरे खुली करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:27 PM