मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : नवापूर तालुक्यासह गुजरात हद्दीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आला आहे. यामुळे शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. तर खोकसा-चिंचपाडा दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.
शहरासह परिसरात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे रंगावली नदीला पूर आला. पुराचे पाणी आणि महामार्ग कामाच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवले गेल्याने धायटा व इस्लामपूरा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. या भागातील नागरिकांना गुडघ्याएवढ्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. दरम्यान, खोकसा-चिंचपाडा रस्त्यावर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. परंतु नदीला आलेल्या पुरामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. पर्यायाने या परिसरातील दहा गावातील ग्रामस्थांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. वाहनांची ये-जा बंद असल्याने संपर्क तुटला आहे.