नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते वडफळीदरम्यान बोती गावाजवळील पुलाला तडे गेले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तडा गेल्याने सुरू असलेल्या पावसात पूल वाहून जाण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी मोलगी ते वडफळी हा रस्ता तयार करण्यात आला होता. प्रथम राज्य मार्ग क्रमांक तीन अशी त्याची बांधकाम विभागाकडे नोंद आहे.
सातपुड्यातील नागरिकांना गुजरात राज्यातील मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर गणला जातो. मार्गावरून मोठी वाहतूक होत असल्याने रस्त्याचा विकास गेल्या काही वर्षात करण्यात आला आहे. या अंतर्गत पिंपळखुटा ते मोकसदरम्यान पुलाचे बांधकाम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे. परंतु सुरू असलेल्या पावसात या पुलाला तडा जाऊन भिंत कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे प्रशासनाने तातडीने पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.वडफळी भागातील नागरिकांना मोलगी येथे येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. पावसात रस्ता वाहून गेल्यास अतिदुर्गम भागातील वडफळी गावाचा संपर्क नंदुरबार जिल्हा आणि महाराष्ट्रासोबत तुटणार आहे. यामुळे प्रशासनाने पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.