रमाकांत पाटील -
नंदुरबार : राज्यातील १०० टक्के गावांचे विद्युतीकरण झाल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी जिल्ह्यातील ८५ गावे मात्र अद्यापही काळोखातच आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ही गावे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांच्या विद्युतीकरणासाठी १८० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी निधीचा प्रश्न अजून सुटलेला नाही.
राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ९३० गावे आणि दोन हजार ९९१ पाड्यांपैकी ८४५ गावे आणि दोन हजार २३ पाड्यांचे विद्युतीकरण झाल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले.
उर्वरित ८५ गावे व ९६८ पाड्यांसाठी विद्युतीकरण करण्याचा आराखडाही यावेळी तयार करण्यात आला. त्यात एक गाव आणि २३३ पाडे विविध योजनांतून विद्युतीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आले, तर ८४ गावे आणि ७३५ पाडे हे वीज कंपनीने राज्य शासनाच्या निधीतून करण्यासाठी प्रस्तावित केले. त्याकरिता १८० कोटी ६२ लाख रुपये खर्चाचा आराखडाही तयार केला. परंतु गेल्या पाच वर्षांपासून हा आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आज हा खर्च जवळपास २५० कोटींवर पोहोचला आहे. मात्र, त्यासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात तरी या गावांना प्रकाश पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.