शहादा- जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या असलोद येथील गणेश अनिल माळी याच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी अनेक दाते पुढे आले आहेत. यातून त्याला आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने सोमवारी दुपारी मुंबई येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. याठिकाणी त्याची तपासणी होऊन कृत्रिम हात देण्याबाबत प्रयत्न केला जाणार आहे.
असलोद येथील गणेश अनिल माळी याचा संघर्ष लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. त्याच्या समस्येची दखल घेत अनेकांनी त्याला मदतही दिली आहे. परंतु, त्याला दोन हात मिळावेत, यासाठी प्रयत्न झाले नव्हते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून त्याला कृत्रिम अवयव देण्याबाबत चर्चा झाली होती. यातून त्याला प्राथमिक स्तरातील तपासण्यांसाठी मुंबईत रवाना करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आमदार पाडवी यांनी मुंबई येथील नामवंत रुग्णालयातील तज्ज्ञांकडून गणेश याची तपासणी करून घेण्याचे निश्चित केले आहे. त्याच्यावर होणाऱ्या या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.