नंदुरबार : शहादा तालुक्यातील परिवर्धे येथे माजी जिल्हा परिषद सदस्याच्या नातवाला ऊस वाहून नेणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली. परिवर्धे गावातच घडलेल्या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश केला होता. मयत २२ वर्षीय युवकाचे दोन दिवसांपूर्वी लग्न ठरले होते.सागर संतोष सोनवणे (२२) असे मयत युवकाचे नाव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एकनाथ जामसिंग ठाकरे यांचा नातू असलेला सागर रविवारी सकाळी घरातील शेळ्या चारण्यासाठी शेतशिवाराकडे जात होता. दरम्यान, शहादा-बोरद रस्त्याने ऊस घेऊन कारखान्याकडे निघालेल्या एमएच ०४ डीडी ९८२६ या ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली.
धडकेत सागर हा खाली पडल्याने ट्रक त्याच्या अंगावरुन चालून गेला, यामुळे सागर याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत झालेल्या अपघाताची माहिती सागरच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मयत सागर हा अविवाहित होता.
दोन दिवसांपूर्वीच त्याचा विवाह ठरला होता. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.